Bapaye Eye Hospital

डोळ्यात दिसणारे काळे डाग / फ्लोटर

डोळ्याच्या आतमधे चमकणारी वीज / फ्लॅश

डॉ. मनीष बापये,

मोतीबिंदू आणि रेटिना तज्ञ

डॉ. बापये हॉस्पिटल,

नाशिक

बर्‍याच वेळा पेशन्ट, अचानक डोळ्यापुढे काळे डाग दिसू लागले म्हणून येतात. डोळ्याच्या आतमधे डास किंवा माशी फिरत असावी असा भास होतो. काही लोक चष्म्यावर डाग पडले असतील असे समजून चष्मा परत परत स्वच्छ करतात. ह्यालाच फ्लोटर असे म्हणतात. ह्या लेखामध्ये आपण या फ्लोटर विषयी माहिती घेऊ.

डोळा कॅमेर्याप्रमाणे काम करतो. कॅमेर्यामध्ये बाहेरील गोष्टींची प्रतिमा फिल्म्वर पडते व फोटो निघतो. नेत्रपटल ही डोळ्याच्या कॅमेर्यची फिल्मच आहे. आपण जेव्हा एखादया वस्तूकडे पहातो तेंव्हा डोळ्यामध्ये येणारे प्रकाश किरण डोळ्याचे बुबुळ (Cornea) आणि भिंग ( Crystalline lens), नेत्रपटलावर (रेटिना) फोकस करतात. नेत्रपटलावर  समोरील गोष्टीची प्रतिमा तयार होते आणि दृष्टिचेतेद्वारे मेंदुकडे पोहोचवली जाते. भिंग (लेन्स) व नेत्रपटल यामधील जागा व्हिट्रीयस नावाच्या जेलिसरख्या पदार्थाने व्यापलेली असते.  वाढत्या वयाप्रमाणे व्हिट्रीयसचे जेलिपासून पाण्यासारख्या पदार्थात रूपांतर होते. ह्या पाण्यामध्ये जेलीचे कण फिरत राहतात. ते रेटिनाच्या पुढे असल्याने त्यांची प्रतिमा व्यक्तीला जाणवते. काही लोकांना डोळ्याच्या आत छोटी साखळी सारखी प्रतिमा दिसते.

सहसा फ्लोटरचा नजरेला काही त्रास किंवा दुष्परिणाम होत नाही. डोळ्यात फक्त छोटे काळे डाग फिरत असल्याची जाणीव होते. हे काळे डाग पांढर्‍या बॅकग्राऊंड वर जसेकी पांढरी भिंत किंवा निरभ्र आकाश याकडे बघितल्यावर जास्त जाणवतात. पण त्यामुळे दृष्टी कमी होत नाही.

परंतू एका विशिष्ट वेळी व्हिट्रीयस नेत्रपटलापासून सुटून येते, याला पोस्टिरियर व्हिट्रीयस डिटॅचमेंट (PVD) असे म्हणतात. P.V.D नंतर रुग्णांना डोळ्यासमोर अचानक फ्लोटर दिसू लागतात. काही रुग्णांना वीज चमकल्याप्रमाणे आभास होतो. ह्याला फ्लॅश म्हणले जाते. व्हिट्रीयसचा नेत्रपटलावर ताण आल्यामुळे असे जाणवते. PVD होताना रेटिनाची एखादी रक्तवाहिनी फुटून डोळ्याच्या आतमध्ये कमी अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होतो. असे झाल्यास मोठ्या प्रमाणावर फ्लोटर दिसू लागतात आणि नजर कमी होते. हा रक्तस्त्राव सहसा पूर्णपणे कमी होतो आणि नजर पूर्ववत होते. परंतू काही प्रमाणात फ्लोटर मागे राहू शकतात.

क्वचित प्रसंगी PVD होताना रेटिनावर खूप ताण येतो व त्याला छिद्र पडते. अशा पेशंटना रेटिनाचे लेसर करावे लागते.

डोळ्याच्या आतील थराना काही वेळा सूज येते. याला uveitis म्हणतात. ह्या पेशंटच्या डोळ्यात फ्लोटर बर्‍याच प्रमाणात राहतात.

जर फ्लोटर इतके जास्त असतील की त्यामुळे नजर कमी होत असेल किंवा पेशंटच्या दैनंदिन आयुष्यात बाधा येत असेल तर व्हिट्रेक्टोमी शस्त्रक्रिया करून ते काढता येतात. अर्थात अशा पेशंटची संख्या खूप नगण्यच असते.

हे लक्षात ठेवा.

फ्लोटर हे अनेक लोकांना दिसतात पण फारच क्वचित प्रसंगी ते नजरेला हानिकारक असतात. फ्लोटर दिसू लागल्यास घाबरून जाऊ नका. परंतु डोळ्याची संपूर्ण तपासणी करून घ्या.

फ्लोटर साठी केल्या जाणार्‍या व्हिट्रेक्टोमी शस्त्रक्रियेचा व्हिडिओ खालील लिंकवर बघा.

https://youtu.be/zjlRw7PQg6A?si=crvqyrisyJeS0gyN

Details

Dr. Maneesh Bapaye

Dr. Bapaye Hospital, Behind NDCC Bank, Old Agra Road, Nashik- 422001

Phone: (0253) 2506505/2509421

email: drbapayehospital@rediffmail.com

Website: bapayeeyehospital.com

Scroll to Top