डॉ. मनीष बापये
डॉ.बापये हॉस्पिटल, नाशिक
भारतातील व भारतीय उपखंडातिल समाजामध्ये मधुमेहाचे प्रमाण जवळ जवळ १८% इतके वाढले आहे. जगातील इतर लोकांपेक्षा हे खुपच जास्त आहे. डोळे, मूत्रपिंड\, हाता पायाच्या नसा, ह्रदय, मेंदू इत्यादि महत्वाच्या अवयवावर मधुमेहाचा दुष्परिणाम होउन प्राणघातक व दृष्टिभक्षक आजार होऊ शकतात. डोळ्यात मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपचार याची आपण माहिती घेऊ.
डोळ्यांची रचना:
डोळा कॅमेरर्याप्रमाणे काम करतो. कॅमेरर्यामध्ये बाहेरील गोष्टींची प्रतिमा फिल्म्वर पडते व फोटो निघतो. नेत्रपटल ही डोळ्याच्या कॅमेर्यची फिल्मच आहे. या नेत्रपटलावारिल मॅक्युला हा टाचणीच्या डोक्याएवढा भाग अत्यंत संवेदनाक्षम असतो. नेत्रपतालाच्या इतर भागंपेक्षा शंभरपट. मॅक्युलाचे आजार दृष्टिचे अतोनात नुकसान करतात. डोळ्यामध्ये येणारे प्रकाश किरण नेत्रपटलावर (रेटिना) फोकस केले जातात. नेत्रपटलावर समोरील गोष्टीची प्रतिमा तयार होते आणि दृष्टिचेतेद्वारे मेंदुकडे पोहोचवली जाते.
मधुमेह व नेत्रविकार :
मधुमेहामुळे खालील नेत्रविकर जडण्याची शक्यता असते –
१) वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे.
२) पुन्हा पुन्हा रांजणवाडी येणे
३) डोळ्यात होणारे रक्तस्त्राव
४) मोतीबिंदू – डायबेटीस च्या रुग्णांमध्ये मोतीबिंदूची झपाट्याने वाढ होते.
५) काचबिंदू – डायबेटीस च्या रुग्णांमध्ये काचबिंदूचे प्रमाण जास्त असते.
६) दृष्टीचेतेस सूज येणे (optic neuritis)
७)अचानक येणारा तिरळेपणा व वस्तू दोन दिसणे (double vision) ( डोळ्यांची हालचाल करणार्या स्नायुंचे पॅरॅलिसिस झाल्यामुळे)
८) मधुमेह नेत्रपटल विकार(डायबेटिक रेटिनोपॅथी)
या सर्वांतील डायबेटिक रेटिनोपॅथी ( यापुढे याला डा. रे. असे संबोधले आहे) हा विकार सर्वात भयंकर आहे. त्यामुळे येणारे अंधत्व निवारण होणे अतिशय अवघड आहे. प्रत्येक मधुमेही रुग्णांना डा. रे. चा विकार हा होतोच.२० वर्षात जवळजवळ ९०% रुग्णांना डा. रे. म्हणून त्याच्या विकार आपण विस्ताराने करू.
डायबेटिक रेटिनोपॅथी कारणमीमांसा वा प्रकार
१)NPDR( Non- proliferative D.R)- निरोगी नेत्रपटलावरील रक्तवाहिन्या लिकप्रूफ असतात. त्यात वाहणारे कुठलेही द्रव्य बाहेर येऊ शकत नाही. परंतु डा. रे. चा मधील रक्तवाहिन्यांत येणाऱ्या विकृतीमुळे रक्तातील द्रव्य पदार्थ वा लालपेशी बाहेर झिरपतात. त्यामुळे नेत्रपटलास सूज येते. लाल रक्ताचे ठिपके दिसू लागतात. बाहेर रक्ताचे ठिपके दिसू. बाहेर आलेले कॉलेस्ट्रॉल चे पिवळे ठिपके दिसू लागतात.
२) PDR (Proliferative D.R)- ही NPDR च्या पुढची अवस्था आहे. यामध्ये नेत्रपटलावरील केशवाहीन्या नष्ट होऊ लागतात. साहजिकच त्या नेत्रपटलाच्या ज्या भागाचे पोषण करतात, तो प्राणवायू विना गुदमरू लागतो. म्हणून तेथे नवनिर्वाचित रक्तवाहिन्यांचे जाळे तयार होते. या फारच नाजूक व कमकुवत असल्यामुळे त्या फुटतात व रक्तस्त्राव होतो. त्यांच्या निर्मितीबरोबरच नेत्रपटलवर कोलिष्टकासारखे जाळे तयार होते. अखेर याची परिणती डोळ्यातील रक्तस्त्राव व रेटायनल डिटॅचमेंट या भयंकर दृष्टीनाशक रोगात होते.
३) Maculopathy (मॅक्युलोपॅथी)- आपण वर पाहिले आहे की मॅक्युला या दृष्टीचा जणू प्राणच आहे. त्यालाच जर मधुमेहाने इजा झाली तर, सूज आली तर लिखाण, वाचन, टी. व्ही. पाहणे इत्यादीसाठी लागणारी तीक्ष्ण दृष्टी नष्ट होती.
नेत्रपटलाच्या तपासण्या
१) नेत्रपटल तपासणी (Funduscopy)
२) फंडस फोटोग्राफी- फंडस कॅमेरा या मशीनने नेत्रपटलाच्या विविध भागांचे फोटो काढून नेत्रपटलाचा नकाशा तयार केला जातो. डा.रे. चे स्वरुप समजण्यास व पुढील काळात संदर्भासाठी याचा उपयोग होतो.
३) फ्लुरेसिन अँजिओग्राफी (F. F. A)-
डा.रे. हा रक्तावाहिन्यांचा विकार असल्याने अँजिओग्राफी अत्यंत महत्वाची आहे. यामध्ये फ्लुरेसिन औषधाचे इंजेक्शन हाताच्या शिरेत देऊन ते औषध नेत्रपटलावारिल रक्तवहिन्यात आले की त्याच्या प्रवासाचे एका पाठोपाठ एक फोटो काढले जातात व त्यावरून पडद्याच्या विक्रुतिची पूर्ण कल्पना येते व उपचारांची दिशा ठरविली जाते.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा )
४) आय. सी. जी.(ICG Angiography)
इंडोसायनीन ग्रीन हे औषध शिरेत टोचून नेत्रपटलावारिल कृष्णपटलाची अँजिओग्राफी केली जाते. ही विशेषतः मॅक्युलासाठी असते.
५) ऑप्टिकल कोहिरन्स टोमोग्राफी (OCT)
ही अत्याधुनिक तपासणी मॅक्युलावर झालेल्या दुष्परिणाम अचूकपणे मापन करते. या तपासणीने मॅक्युलाला सूज आली असेल तर त्याचे निदान व तीव्रता मोजली जाते. त्याचप्रमाणे उपचार केल्यानंतर त्याचा परिणाम देखील O.C.T. ने बघता येते.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा )
Optical Coherence Tomography (OCT)
६) ऑप्टिकल कोहिरन्स टोमोग्राफी अँजिओग्राफी (OCTA)
ह्या अत्याधुनिक नवीन प्रकारच्या तपासणीमध्ये नेत्रपटलावरील रक्तवाहिन्या कोणत्याही इंजेक्शन शिवाय दिसू शकतात. ज्या रुग्णांना फ्लूरेसीन इंजेक्शन देणे शक्य नसते, किंवा पुनः पुन्हा अँजिओग्राफी करण्याची गरज असते अशा रुग्णांसाठी ही तपासणी अतिशय उपयुक्त ठरते. यासाठी अत्याधुनिक OCT मशीन वापरले जाते.
कलर फंडस फोटोग्राफी
फ्लूरेसीन अँजिओग्राफी
OCT अँजिओग्राफी
डायबेटिक रेटिनोपथी साठी उपचार पद्धती
१) लेसर
लेसर म्हणजे प्रकाशातील विवक्षित लहरींची शक्ती वाढवून त्यांना सामर्थ्यशाली बनविले जाते व प्रचंड उष्णता निर्माण होऊन त्यांच्याद्वारे उपचार केले जातात.
लेसर कसे कार्य करते ?
दृष्टिअपाचारासाठी अत्यंत सूक्ष्म आकाराचे लेसर किरण उपयोगात आणले जातात. त्यामुळे नेत्रपटलाचे नुकसान होत नाही तर –
१) फक्त विकृत रक्तवाहिन्या नष्ट केल्या जातात.(Focal Treatment )
२) नविन दोष निर्माण होऊ नये यासाठी सर्वच नेत्रपटलावर लेसर उपचार करतात ( PRP- Pan Retinal Photo Coagulation)
लेसर उपचार पद्धती साधी आहे व रुग्णास त्रासदायक नाही. यामध्ये डोळ्यात औषध घालून डोळ्याची बाहुली मोठी केली जाते व स्लिट लंप या यंत्रणा वर बसून डोळ्यात लेझर चे किरण सोडले जातात.१५-२० मिनिटात हे लेसर उपचार पूर्ण होऊन रुग्ण घरी जातो.
लेसर उपचारानंतर काही दिवस दृष्टी मंद झाली आहे असे वाटते.परंतु ती लवकरच पूर्ववत होते. लेसर उपचार ही प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली आहे म्हणजेच जी दृष्टी नष्ट पवाली आहे ती या उपचाराने परत मिळत नाही. परंतु यामुळे सद्यस्थितीतील दृष्टी वाचवली जाते व अंधत्व टाळता येते. म्हणुनच डा. रे. प्राथमिक अवास्तेत असताना हे उपाय करावेत. एकदा लेसर केले तरी नविन जगी डा. रे. येऊ शकते म्हणून उपचारानंतरही नेत्रपरिक्षा करीत रहाणे जरुर आहे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा )
२) डोळ्यातील इंजेक्शन
हे इंजेक्शन डोळ्याच्या आत (व्हीट्रीयस मध्ये) दिले जाते. डोळ्यात जन्तुसंसर्ग होऊ नये म्हणून हे इंजेक्शन ऑपरेशन थिएटरमध्ये द्यावे लागते. काही वेळा 2 इंजेक्शन एका वेळी द्यावी लागतात. बव्हतांशी रुग्णांमध्ये पुन्हा इंजेक्शन द्यावी लागण्याची शक्यता असते.
अ) Anti VEGF ( Avastin/ Razumab/Accentrix) : हे इंजेक्शन डोळ्यातील कमी न होणारा रक्त्त्राव, लेझरपूर्वी किवा नंतरही नेत्रपटलावरील पसरलेले रक्तवाहिन्यांचे जाळे कमी करणे, मॅक्युलाला व दृष्टीचेतेला येणारी सूज कमी करणे यासाठी वापरले जाते. ह्या इंजेक्शन चा सहसा काहीही दुष्परिणाम होत नाही.काही रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करण्या पूर्वी हे इंजेक्शन दिले जाते.
ब) स्टरॉइड : हे इंजेक्शन मॅक्युलाला येणारी सूज कमी करण्यासाठी वापरले जाते. ह्यामध्ये डोळ्याचे प्रेशर (काचबिंदू) आणि मोतीबिंदू वाढण्याची शक्यता असते व त्यासाठी डॉ. च्या कडे तपासणी करावी.
क) ओझेरडेक्स : हे स्टरॉईडस च अत्याधुनिक प्रकारचे इंजेक्शन आहे. हे इंजेक्शन डोळ्यात ३-४ महिनेपर्यंत राहते. मॅक्युलाला येणारी सूज कमी करण्यासाठी हे इंजेक्शन वापरले जाते. ह्यामध्ये काचबिंदू व मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी असते.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा )
Intravitreal Anti-VEGF Injections
३) डा. रे. व शस्त्रक्रिया
ह्या शस्त्रक्रियेला व्हिट्रेक्टोमी असे म्हणतात. यामध्ये डोळ्यातील व्हिट्रीयस व त्यामधील रक्तस्त्राव व नेत्रपटलावरील रक्तवाहिन्यांचे जाळे काढले जातात. नेत्रपटल जागेवरून सुटले असल्यास किंवा मॅक्युलावर ताण येवून सूज कमी होत नसल्यास सुद्धा ही शस्त्रक्रिया केली जाते. ह्यामध्ये लेसरचाही उपयोग केला जातो. अत्याधुनिक (२३ किवा २५ गेज) पद्धतीने केल्यामुळे टाके न घालता शस्त्रक्रिया करता येते. काही रुग्णांमध्ये डोळ्या मध्ये सिलिकॉन ऑईल हे एक प्रकारचे तेल घालावे लागते. काही काळानंतर दुसरी शस्त्रक्रिया करून ते काढावे लागते. हा आजार अत्यंत गंभीर असल्यामुळे नजर सुधारण्यास कालावधी लागतो. काही वेळा एकापेक्षा अधिक वेळा शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते. जर मोतीबिंदू असेल तर दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळेस करता येतात.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा )
Vitrectomy for Proliferative Diabetic Retinopathy
मधुमेही रुग्णांची नेत्रतपासणी कधी करावी ?
१) ज्यावेळी मधुमेहाचे निदान होईल त्यावेळी प्रथम नेत्रपटल तपासणी करावी व नेत्रपटलाचे फोटो काढून ठेवावेत. जर प्रथम तपासणीत डा.रे. आढळली तर पुढील तपासण्या करून आवश्यक उपचार करावे लागतात.
२) जर प्रथम तपासणीत डा.रे. आढळली नाही तर दर सहा महिन्यांनी नेत्रपटल तपासणी करावी.
३) ज्या तपासणीमध्ये आजार आढळेल, त्यावेळी पुढील तपासण्या करून आवश्यक ते उपचार करावे.
४) एकदा डा.रे. चा आजार आढळला की दर ३ महिन्यांनी नेत्रपटल तपासणी करावी.
५) डा.रे. चा रोग बळवण्या आधीच लेसर उपचार करावेत.
६) लेसर अथवा इतर उपचारानंतर ही दर ३ महिन्यांनी नेत्रपटल तपासणी अत्यावश्यक आहे.
७) मधुमेह नेहेमी नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे. मधुमेह नियंत्रणात नसल्यास उपचारानंतर देखील डोळ्यातील आजाराची वाढ होऊन अंधत्व येवू शकते.
मधुमेहाची सांगत त्रासदायक होऊ नये म्हणून आपण –
१) औषध व आहार याकडे दुर्लक्ष करू नका.
२) रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर ठेवा. यामुळे डा. रे. वाढू नये यासाठी फायदा होतो.
३) ठराविक व्यायाम करा.
४) रक्तदाब आटोक्यात ठेवा.
५) धूम्रपान, दरुपासून दूर रहा
६) जर डा. रे. असेल तर किडनी विकरांसाठी तपासणी करून घेण्यास विसरू नका.
लेखक:
डॉ. मनीष बापये,
रेटिना सर्जन,
डॉ. बापये हॉस्पिटल, NDCC बँकच्या मागे, हॉटेल सम्राट समोर, जुना आग्रा रोड,नाशिक.
फोन: ०२५३-२५०६५०५/२५०९४२१
email : drbapayehospital@rediffmail.com
Website: bapayeeyehospital.com
हे विवेचन ऑडिओ मध्ये ऐका