वृद्धत्व नेत्रपटल विकार

(AGE- RELATED MACULAR DEGENERATION)

वृद्धत्व नेत्रपटल विकार हे वयाच्या 60 वर्षांवरील रुग्णांमध्ये अंधत्वाचे महत्वाचे कारण आहे. पाश्चात्य देशांमध्ये हा आजार अधिक असून भारतीय उपखंडा मध्ये देखील याची झपाट्याने वाढ होताना दिसते. यापुढे या विकारास A.M.D असे संबोधले आहे. A.M.D मध्ये गेलेली नजर परत आणता येत नाही. परंतु त्याचे वेळीच निदान झाल्यास आजार वाढण्याचा वेग कमी करता येतो व असलेली नजर टिकविता येते.

डोळ्यांची रचना:

     डोळा कॅमेऱ्या प्रमाणे काम करतो. कॅमेऱ्यामध्ये बाहेरील गोष्टींची प्रतिमा फिल्म वर पडते व फोटो निघतो. नेत्रपटल ही डोळ्याच्या कॅमेऱ्याची फिल्मच आहे. या नेत्रपटलावारिल मॅक्युला हा टाचणीच्या डोक्याएवढा भाग अत्यंत संवेदनाक्षम असतो. नेत्रपटलाच्या इतर भागापेक्षा शंभरपट. मॅक्युलाचे आजार दृष्टिचे अतोनात नुकसान करतात. डोळ्यामध्ये येणारे प्रकाश किरण नेत्रपटलावर (रेटिना) फोकस केले जातात. नेत्रपटलावर  समोरील गोष्टीची प्रतिमा तयार होते आणि दृष्टिचेतेद्वारे मेंदुकडे पोहोचवली जाते.

A.M.D ची लक्षणे:

१) सुरवातीला सरळ रेघा वक्र दिसू लागतात. कालांतराने ही वाढत जाते.

२) तसेच वाचन करताना अक्षरे एकमेकात मिसळणे, काही अक्षरे मधूनच न दिसणे इ. प्रकार होतात.

३)जसजसा आजार वाढतो, तसतसे नजरेच्या मध्यभागी काळा डाग दिसू लागतो. हा डाग पुढे अधिक गडद होत जातो.(Fig.1)

४) वेळेवर उपचार न झाल्यास हा काळा डाग आकाराने वाढतो व चालण्या – फिरण्याची नजर देखील जाते.

A.M.D चे प्रकार –

१) शुष्क (Dry A.M.D.): ८०% पेक्षा अधिक रुग्णामध्ये या प्रकारचा आजार होतो. या प्रकारात मॅक्युलाला व त्या जवळील नेत्रपटल पातळ होवू लागते. Drusen नावाच्या पिवळसर रंगाच्या गाठी मॅक्युलावर दिसू लागतात. त्यामुळे मॅक्युलातील अतिसंवदेनाक्षम नेत्रपेशी हळूहळू नाश पावतात. या प्रकारात नजर हळूहळू कमी होते. परंतु या प्रकाराला उपाय करता येवू शकत नाही. Antioxidant ची औषधे वापरून तसेच तंबाखू सेवन बंद करून या आजाराच्या वाढीचा वेग कमी करता येतो. (Fig.2)

२) सर्द ( Wet A.M.D): या प्रकारात मॅक्युलाखाली दूषित रक्तवाहिन्यांची वाढ होते. सुरवातीच्या काळात या रक्तवाहिन्यांमधून पाणी झिरपत व मॅक्युलास सूज येते. कालांतराने रक्तवाहिन्या वाढून नेत्रपटलाखली रक्तस्त्राव होतो.जसजसा रक्तवाहिन्यांची वाढ होते, तसतशी वर नमूद केलेली लक्षणे वाढू लागतात.(Fig.3)

३) पी. सी. वी: Polypoidal Choroidal Vasculopathy (PCV) हा आजार आशिया खंडात अधिक आढळतो. यामध्ये मॅक्युला खाली/ जवळ रक्ताच्या गाठींची वाढ होते. ह्यात नेत्रपटला खाली अचानक मोठ्याप्रमाणावर रक्तस्राव होवून नजर जाण्याची शक्यता असते. या आजाराचे उपचार अधिक काळ चालतात तसेच येणारी नजर काही प्रमाणात कमी असते (Fig.4) हा आजार नेत्रपातलाच्या बाह्य भागात देखील होवू शकतो. त्याला PEHCR असे संबोधले जाते.

नेत्रपटलाच्या तपासण्या

१) नेत्रपटल तपासणी (Funduscopy)- डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या करून रेटिनाची indirect ophthalmoscope या मशिन ने तपासणी केली जाते.

२) फंडस फोटोग्राफी- फंडस कॅमेरा या मशीनने नेत्रपटलाच्या विविध भागांचे फोटो काढून नेत्रपटलाचा नकाशा तयार केला जातो. AMD चे स्वरुप समजण्यास व पुढील काळात संदर्भासाठी याचा उपयोग होतो.

३) फ्लुरेसिन अँजिओग्राफी (F. F. A) – यामध्ये फ्लुरेसिन औषधाचे इंजेक्शन हाताच्या शिरेत देऊन ते औषध नेत्रपटलावारिल रक्तवहिन्यात आले की त्याच्या प्रवासाचे एका पाठोपाठ एक फोटो काढले जातात व त्यावरून पडद्याच्या विक्रुतिची पूर्ण कल्पना येते व उपचारांची दिशा ठरविली जाते.

(Youtube Video Link: https://youtu.be/m7_y1HnUb2Q)

४) आय. सी. जी.(ICG Angiography) – इंडोसायनीन ग्रीन हे औषध शिरेत टोचून नेत्रपटलावारिल कृष्णपटलाची अँजिओग्राफी केली जाते. ही विशेषतः मॅक्युलासाठी असते. PCV मध्ये ही तपासणी अत्यावश्यक ठरते

५) ऑप्टिकल कोहिरन्स टोमोग्राफी (OCT) – ही अत्याधुनिक तपासणी कोणतेही इंजेक्शन न देता काही मिनिटात केली जाते.यात मॅक्युलावर झालेल्या दुष्परिणामांचे अचूकपणे मापन करते. त्यामुळे AMD च्या रुग्णासाठी ही तपासणी अत्यावश्यक आणि प्रमुख तपासणी झाली आहे. या तपासणीने मॅक्युलाला सूज आली असेल तर त्याचे निदान व तीव्रता मोजली जाते. त्याचप्रमाणे उपचार केल्यानंतर त्याचा परिणाम देखील O.C.T. ने बघता येते.

 (Youtube video: https://youtu.be/pLEIO-G1K14)

उपचार पद्धती :

१) डोळ्यातील इंजेक्शन (Anti VEGF) (Fig.5) – AMD तसेच इतर नेत्रपटल विकारात VEGF हा रक्तातील घटक प्रचंड प्रमाणात वाढतो आणि त्यामुळे नेत्रपटलाच्या रक्तवाहिन्यांमध्ये दुष्परिणाम होतो. हा घटक कमी करणारी औषधे/ इंजेक्शन AMD ची उपचाराची प्रमुख पद्धत असते. या इंजेक्शन मुळे नेत्रपटलाखाली वाढलेल्या दूषित रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व त्यांची पुनर्निर्मिती व वाढ होण्याची शक्यता कमी होते. उपचाराच्या सुरवातीला दर महिन्याला एक याप्रमाणे ३ ते ४ इंजेक्शन्स दिली जातात (Fig.6). या इंजेक्शन साधारणपणे १ महिन्यापर्यंत काम करतात. यानंतर रुग्णांची ४ ते ८ आठवड्यात तपासणी चालू ठेवावी लागते. जर रक्तवाहिन्यांची पुनर्निर्मिती होताना आढळली तर इंजेक्शन द्यावे लागते. त्यामुळे एका रुग्णाला नक्की किती इंजेक्शन द्यावी लागतील याबद्दल पूर्व कल्पना देणे अशक्य आहे. Avastin (Bevacizumab), Accentrix/ Razumab (Ranibizumab), Pagenex (Brolicizumab), Eylea (Aflibercept) ही इंजेक्शन सध्या उपलब्ध आहेत आणि नवनवीन इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. कोणत्या पेशंटला कोणते injection योग्य आहे ते डॉक्टर ठरवितात व तसे सुचवितात.

(Youtube Video: https://youtu.be/Qce6MBuZfHI)

ब) स्टेरॉइड ( Triamcinolone) आणि ओझरडेक्स (Dexamethasone implant): A.M.D. च्या अगदी मोजक्या रुग्णांमध्ये ही उपचार प्रणाली वापरली जाते.

२) लेसर उपचार – A.M.D. च्या आजारात फोटो डायनॅमिक थेरपी (P.D.T) किवा ट्रान्स प्युपिलरी थर्मोथेरपी  (T.T.T) या लेसर उपचार पद्धतीचा वापर केला जातो. यापैकी P.D.T. ही लेसर प्रणाली अधिक उपयुक्त असते. या लेसर उपचारात शिरेतून ‘विसूडाइन’ हे विशिष्ट इंजेक्शन शरीरात सर्वत्र पसरते तसेच नेत्रपटलातील दूषित रक्तवाहिन्यांमध्ये जावून बसते. कॉम्प्युटरचा साहाय्याने या रक्तवाहिन्यांचे क्षेत्रफळ मोजले जाते. तेवढ्याच क्षेत्रफळावर लेसेचे अतिशीत किरण देवून विसूडाइन इंजेक्शनची प्रक्रिया होते. त्यामुळे दूषित रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपुरवठा बंद होतो व त्या आकुंचन पावतात.

३) एकत्रित उपाययोजना ( Combined treatment) PDT लेसर आणि वरीलपैकी एक इंजेक्शन एकत्रित रित्या वापरले जाते. या दोन्ही उपचार प्रणाली वेगवेगळ्या पद्धतीने काम करीत असल्याने कोणत्याही एका प्रकरापेक्षा एकत्रित उपाययोजनेची उपयोग अधिक होतो.

हे लक्षात ठेवा:

१) A.M.D. हा आजार दोन्ही डोळ्यात होतो. जर आजार एका डोळ्यात असेल तर दुसऱ्या डोळ्यात कालांतराने होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे दुसऱ्या डोळ्यावर लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे.

२) अॅम्सलर टेस्ट (Fig.7) ही तपासणी रुग्णांना घरच्या घरी करण्यास दिली जाते. ती रोजच्या रोज करावी. ही तपासणी आजार झालेल्या डोळ्यातील आजाराच्या पूनरवधिवर लक्ष ठेवण्यास व न झालेल्या डोळ्यात आजाराचे लवकर निदान होण्यास उपयुक्त ठरते.

३) धूम्रपान, अधिक रक्तदाब(Hypertension), फास्ट फूड इ. कारणांनी A.M.D. चा विकार वाढतो. त्यामुळे या गोष्टी टाळाव्या.

४) वयाच्या ५० वर्षानंतर दर वर्षी संपूर्ण नेत्र तपासणी करून घ्यावी आणि त्यामधे रेटीना तपासणी सुद्धा केली जाते ह्यावर भर द्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top

Book an Appointment Now

popup form